Pune Crime Accident News | पुणे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले, वेगवेगळ्या अपघातात पाच जणांनी गमावला जीव

0

पुणे : – Pune Crime Accident News | पुणे शहर देशातील एक अग्रगण्य मेट्रो शहर म्हणून ओळखले जाते. शहरात शिक्षण किंवा नोकरीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण येत असतात. मात्र, याच पुण्यात वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. पुणे शहरात अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या अपघातांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागते. अनेक रस्ते अपघात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे होतात. शहरात वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रोडवरील धायरी फाटा, सासवड-हडपसर रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

पुणे-नगर रोडवर लोणीकंद परिसरात एका भरधाव दुचाकीस्वाराने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ रंगनाथ इंगळे (वय-65 रा. तितिक्षा पार्क, लोणीकंद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संदेश सेंगर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धायरी फाटा परिसरात पादचारी व्यक्तीचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सतीश रामचंद्र इंजे (वय-39 रा. नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सतीश यांचा मावस भाऊ निलेश चंद्रकांत आढाव (वय-48 रा. पिंपळे गुरव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. मयत सतीश इंजे बुधवारी (दि.12) पहाटे साडेपाच वाजता मॉर्निंग वॉक करत नांदेड सिटीकडे जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. यात गंभीर जखमी होऊन सतीश यांचा मृत्यू झाला.

सासवड-हडपसर रस्त्यावर वडकी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. ट्रकच्या मागील बाजूचे दिवे सुरु नसल्याने दुचाकीस्वार तरुणाला ट्रक दिसला नाही. दुचाकीस्वार ट्रकला पाठीमागून धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. ऋतेश सतीश शेंडगे (वय-21) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबबत रोहित सतीश शेंडगे (वय-24 रा. फुरसुंगी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ट्रक चालक एकनाथ दामु राठोड (वय-26 रा. उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बंद पडलेली बस टोईंग करत असताना पीएमटीची बंद पडलेली बस टोचन करुन घेऊ जाणारी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दोन बसच्या मध्ये चिरडून पीएमपी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. गणेश शिवाजी गुजर असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत शिवाजी बबन गुजर (वय-67 रा. आळंदे ता.भोर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पीएमपी बस चालक अक्षय काशिनाथ घोलप (वय-29) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. भरधाव डंपरने एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या धडापासून शीर वेगळे झाले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेची सून गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी साडेबाराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गंगाधाम रस्त्यावर घडली. दमयंती भुपेंद्र सोलंकी (वय-59 रा. कोंढवा रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलचे नाव आहे. तर जखमी प्रियंका राहुल सोलंकी (वय-38) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालक अशोक छोटेलाल महंतो (वय- 37 रा. बावधन), गणेश प्रकाश बांदल (वय-26) यांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.