PCMC To Nigdi Metro | मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या कामाला सुरुवात; कधीपर्यंत धावणार मेट्रो?

0

पिंपरी चिंचवड : PCMC To Nigdi Metro | पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation-PCMC) ते निगडी या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली. पुणे महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाची ९१० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते.

या मार्गाची लांबी ४.५१९ किलोमीटर असून या मार्गिकेचा खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे. या विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. या मार्गिकेचे बांधकाम स्वीकृतीपत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यांत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या पिंपरी ते निगडी या ४.५१९ किलोमीटर अंतराच्या महामेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यातील मार्गिकच्या ‘व्हायडक्ट’ या कामाचा ठेका केंद्र सरकारच्या रेल विकास निगम लिमिटेडला देण्यात आला आहे.

या कामासाठी निगडी, भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, टिळक चौक आदी ठिकाणच्या सेवा रस्त्यावर सुरक्षा कठडे लावून माती परीक्षण करण्यात येत आहे. माती परीक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.

या कामाची मुदत १३० आठवडे आहे. हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर लोहमार्ग टाकणे, सिग्नल व्यवस्था, विद्युतपुरवठा, स्थानक उभारणी आदी कामांची स्वतंत्रपणे निविदा काढली जाणार आहे. तीन वर्षे तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर निगडीपासून थेट स्वारगेट, रामवाडी आणि वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात पिंपरीतील महापालिका भवनापर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याची शहरवासीयांची मागणी होती. त्यासाठी मोठे आंद विवद्ध उभारण्यात आले. त्याची दखल घेत केंद्र शासनाने या विस्तारीत मार्गाच्या ९१० कोटी १८ लाख खर्चाच्या कामास २३ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मान्यता दिली.

त्यानुसार निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतच्या ५.५१९ किलोमीटर अंतराच्या ‘व्हायडक्ट’ कामाची निविदा काढण्यात आली. ते ३३९ कोटी खर्चाचे काम केंद्राच्या रेल विकास निगम लिमिटेडला मिळाले आहे.

हा मार्ग उन्नत असून तो निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याने उभारला जाणार आहे. लवकरच प्राधिकरणातील नागरिकांचे मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे साॅईल टेस्टिंग करून बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.