RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

नागपूर: RSS On BJP About Support Of Ajit Pawar | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी ‘निवडणूकीत स्पर्धा करा पण मर्यादा पाळा’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांचे कान नुकतेच टोचले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून भाजपला आरसा दाखविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना देखील अजित पवार यांना का सोबत घेतलं? असा सवाल संघ स्वयंसेवक रतन शारदा यांनी या लेखात उपस्थित केला आहे.
अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढा दिला गेला, पण सत्तेसाठी काँग्रेसच्या लोकांना भाजपने सोबत घेतलं, ज्यामुळे कार्यकर्त्यांना बरंच दु:ख झालं. भगवा दहशतवादाचा आरोप करणाऱ्या आणि २६/११ ला आरएसएसचा कट म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे संघाचे स्वयंसेवक दुखावले गेलेत.
रतन शारदा यांनी आपल्या लेखात पुढे असं म्हटलं आहे की, ‘सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नव्हे तर जमिनीवर कठोर परिश्रम करून ध्येय गाठले जाते. भाजप कार्यकर्ते हे त्यांच्या आनंदातच मश्गुल होते, मोदीजींच्या जीवावर ते निर्धास्त होते. विजय आपलाच होणार असे त्यांना वाटत होते.’ अशा कठोर शब्दात रतन शारदा यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
‘लोकसभा निवडणुकीत ४०० चा आकडा पार करण्याचा नारा देणारा भाजप केवळ 240 जागांवरच अडकला, याचे कारण भाजप नेत्यांचा अतिआत्मविश्वास. ‘आएगा तो मोदी ही’ असे मानणारे कार्यकर्ते ‘ग्राउंड रिॲलिटी’ पासून अनभिज्ञ राहिले.’ अशा शब्दात भाजपच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत काय म्हणाले होते?
१० वर्षे शांत राहिलेलं मणिपूर गेल्या वर्षापासून अशांत आहे. गेले दहा वर्ष तिथं शांतता होती. अचानक तिथं अशांतता घडली. तिथं जे काही झालं, ते घडलं आहे की घडवलं आहे, असा प्रश्न आहे. तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या सधन घरातील महिला मद्यपान करून वाहन चालवतात आणि लोकांना चिरडतात. कुठं चालली आहे आपली संस्कृती. जगात ज्यांनी संस्कृती तयार केली, त्यांची ही स्थिती चांगली नाही, असं भागवत यांनी स्पष्ट केले. “देशात एनडीएचं सरकार परत आले आहे. देशात गेल्या १० वर्षात बरंच काही चांगलं झालं. आर्थिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात आमची प्रगती झाली. मात्र, अजूनही प्रश्न संपलेले नाहीत. निवडणुकीत जो काही अतिरेक झाला, त्याच्या पुढं जाऊन आता आम्हाला विचार करायचा आहे.” असेही भागवत यांनी सांगितले.
भागवत पुढे म्हणाले, “प्रचारात ज्या पद्धतीनं चुकीचं वक्तव्य करण्यात आलं, अश्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, याचा देखील विचार करण्यात आला नाही. यामध्ये आम्हाला नाहक ओढण्यात आलं. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला, ते योग्य नाही. निवडणूक लढताना एक मर्यादा असते, त्या मर्यादेचं पालन झालं नाही.
आम्ही आपलं राष्ट्रीय कर्तव्य करत असतो. मत देतो, प्रत्येक निवडणुकीत ते करतो. मात्र, असंच का झालं, का घडलं याच्या चर्चेत आम्ही पडत नसल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. निवडणूक म्हणजे दोन पक्ष असणारचं, त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असते. ते एकमेकांना मागंपुढं करण्याचा प्रयत्न करतात आणि ते केलंही पाहिजे. मात्र त्यातही मर्यादा सर्वांनी पाळली पाहिजे. एकमेकांना मागं करण्यासाठी असत्याचा वापर करायला नको. नेतृत्व निर्माण झालंय मात्र, नेतृत्वाला समाजाची साथ मिळणं आवश्यक असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांचे कान टोचले होते.