Lok Sabha | लोकसभेतील 543 खासदारांपैकी 251 खासदारांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद

मुंबई: Lok Sabha | १८ व्या लोकसभेतील ५४३ खासदारांपैकी २५१ अर्थात ४६% खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. आजवरच्या इतिहासात ही संख्या सर्वात मोठी आहे. त्यापैकी १७० जणांवर खून, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

मंत्रिमंडळातील ८० टक्के केंद्रीय मंत्री हे पदवीधारक असून ९८ टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जारी केलेल्या अहवालातून पुढे आली आहे,

या अहवालानुसार, ११ मंत्र्यांनी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ३ मंत्री हे पदविकाधारक आहेत. २८ मंत्र्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यातील १९ जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांवरील गुन्हे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तब्बल ७० मंत्र्यांकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यातील ६ जणांची संपत्ती १०० कोटींपेक्षाही जास्त आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांच्याकडे सर्वात कमी ३० लाखांची संपत्ती असल्याचे अहवालात नमूद आहे.