Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रात्री उशिरा पाणी मागत असल्याच्या कारणावरुन खून

11th June 2024

पुणे : – Mundhwa Pune Crime News | पाणी देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ केल्याच्या रागातून एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारुन तसेच भिंतीवर डोके जोरात आपटुन खून केल्याची घटना घडली आहे (Murder In Mundhwa Pune) . ही घटना शनिवारी (दि.8) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंढवा गावातील कामगार मैदानाजवळील आनंद निवास येथे घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) एकाला अटक केली आहे.

श्रीकांत निवृत्ती आल्हाट असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुकाराम गायकवाड (वय-35 रा. आनंद निवास, कामगार मैदानाजवळ, मुंढवा गाव, पुणे) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत श्रीकांत यांचा भाऊ संतोष निवृत्ती आल्हाट (वय-46 रा. भावना निवास, महम्मदवाडी, हडपसर) यांनी सोमवारी(दि.10) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ श्रीकांत आरोपी राकेश याच्याकडे रात्री उशिरा पाणी मागत होता. शनिवारी रात्री श्रीकांत याने पाणी मागितले. मात्र, राकेश याने पाणी दिले नाही. त्यामुळे श्रीकांत याने राकेशला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने राकेश याने श्रीकांत याच्या डोक्यात विटेने व सिमेंटच्या दगडाने मारहाण केली. तसेच श्रीकांत याचे डोके भिंतीवर जोरात आपटून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत आल्हाट याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राकेश गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी करीत आहेत.