Murlidhar Mohol On Supriya Sule | मंत्रीपदाच्या टिकेवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं,…’

0

पुणे: Murlidhar Mohol On Supriya Sule | लोकसभा निवडणूका झाल्यानंतर (Lok Sabha Election 2024) नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. दरम्यान, पुण्यात बोलताना सुप्रिया सुळेंनी मोहोळांना टोला लगावला आहे, पुण्याला मंत्रिपद मिळालं याचा आनंद आहे मात्र याचा उपयोग काँन्ट्रक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, ” संविधानानेच देश चालणार आहे हे देशाच्या जनतेने दाखवून दिले आहे. एका मतामध्ये काय ताकद असते हे जनतेने सिद्ध करून दाखविले आहे. तुम्ही धनशक्ती म्हणा, कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारले आहे. पन्नास खोके, एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू पडत नाही, हे दाखवून दिले.

लोकसभेतील आमचे यश मोठं असलं तरी निश्तितच पक्ष प्रतिनिधींची जबाबदारी आता वाढली आहे. यावेळी पुण्यातील उद्योगधंद्यांबाबत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, हिंजवडीमधील ३५ ते ४० आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. मंत्रिपद मिळाले आहे आता पुण्याला. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग काँन्ट्रक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे “, असे म्हणत सुळेंनी खासदार मोहोळ यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या मंत्रीपदाच्या टिकेवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

समाजमाध्यमांवर पोस्ट करत मोहोळ म्हणाले की, “मा. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं.

असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही.

त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.” असे म्हणत मोहोळांनी सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.