Katraj Kondhwa Road Pune Crime News | पुणे : रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू, तीन मुलींना वाचवण्यात यश

0

पुणे : – Katraj Kondhwa Road Pune Crime News | कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरासमोर (Iskcon Temple Katraj) अंदाजे 10 ते 15 फूट खोल खड्डयामधील साचलेल्या पाण्यात 4 मुली पडल्याची घटना घडली. स्थानिकांनी 3 मुलींना तातडीने सुरक्षित बाहेर काढले तर अग्निशमन दलाच्या जवानांनी (Pune Fire Brigade) जखमी अवस्थेत चौथ्या मुलीला पाण्यातून बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, तिचा उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरासमोर रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अंदाजे 10 ते 15 फूट खोल खड्डया खोदण्यात आला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. दुपारी बाराच्या सुमारास चार मुली खड्ड्यात कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या. यामध्ये तिघींना वाचवण्यात यश आले तर एका मुलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरु असून याठिकाणी इस्कॉन मंदिरासमोर काही लोक तात्पुरत्या स्वरुपात झोपड्या टाकून राहतात. त्यामुळे शेजारी असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात येथील महिला व मुली कपडे धुण्यासाठी जात असतात. कपडे धुण्यासाठी गेले असता, खड्ड्यामध्ये पाय घसरुन मुली पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला व पोलिसांना दिली.

दरम्यान, स्थानिकांनी तीन मुलींना बाहेर काढले होते. मात्र, एका मुलीला वाचवण्यात अपयश आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चौथ्या मुलीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

या दुर्घटनेत सरगम शिळावत (वय-15), सेजल शिळावत (वय-13), जानू शिळावत (वय-15) अशी पाण्यातून बाहेर काढलेल्या मुलींची नावे आहेत. तर मुस्कान शिळावत (वय-16) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोंढवा अग्निशमन दलाकडून ड्रायव्हर समीर तडवी, तांडेल दशरथ माळवदकर, फायरमन प्रकाश शेलार, अभिजीत थळकर, विश्वजीत वाघ यांनी मुलीचे शोधकार्यात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.