Maval Pune Crime News | मावळ : जमिनीच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून

0

मावळ : – Maval Pune Crime News | जमिनीच्या वादातून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरात एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना कुसुर गावच्या हद्दीतील टाकवे-खांडी रोडवरील कामा फार्मा येथे बुधवारी (दि.5) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी (Vadgaon Maval Police Station) नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Murder In Maval)

अक्षय बाबाजी जगताप (वय-26 रा. चंदननगर पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन तुरडे, अशोक तुरडे, अंकुश तुरडे व सुभाष तुरडे यांच्यासह पाच ते सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरेलेला कोयता, रॉड, लाकडी दांडके, लोखंडी सळ्या जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मयत अक्षय जगताप व अशोक तुरडे याचा भाऊ अंकुश तुरडे यांच्यात जमिनीवरुन वाद झाला. त्यानंतर शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. मयत अक्षय याने अंकुश याच्या नाकावर बुक्की मारली. त्याचा राग मनात धरुन अशोक तुरडे याने त्याच्या सात ते आठ साथीदारांसह हातात लोखंडी कोयता, रॉड, लाकडी दांडके, लोखंडी सळ्या घेऊन अक्षयला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेत एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन गरुवारी (दि.6) सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.