Balewadi Pune Crime News | पुणे : विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू

0

पुणे : – Balewadi Pune Crime News | उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडी भागात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.4) सायंकाळी पावणे सात वाजता बालेवाडीतील अमर टेक पार्क (Amar Tech Park Balewadi) इमारतीसमोरील रोडच्या फुटपाथ शेजारी घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police Station) या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रकला नरसिंग मिरदुडे (वय 45, रा. विसर्जन घाट, बालेवाडी गाव) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकला यांचा मुलगा संदीप नरसिंग मिरदुडे (वय-28 रा. बालेवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला बालेवाडीतील अमर टेक पार्क इमारतीत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या.

मंगळवारी दुपारी पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला. काम संपल्यानंतर चंद्रकला बसथांब्याकडे जात होत्या. बालेवाडी भागातील पदपथाच्या बाजूला पाणी साचले होते. या परिसरात विद्युत वाहिनी उघड्यावर पडली होती. तेथून निघालेल्या चंद्रकला यांना विजेचा धक्का बसल्याने त्या खाली कोसळल्या. बेशुद्धावस्थेत चंद्रकला पडल्याची माहिती त्यांचा मुलगा संदीप याला समजली.

त्यानंतर चंद्रकला यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. महावितरणच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून महावितरण कंपनीला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.