Ashadhi Wari 2024 | हिरा-राजा, मल्हार-गुलाबला संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान

देहू: Ashadhi Wari 2024 | जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला मिळाली आहे.
तर चौघडा गाडी ओढण्याचा मान टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मिळाला आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली.
सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा व राजा आहे. त्याचप्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार- गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळावी, यासाठी अर्ज केला होता.
पालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.
पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी ही निवड केली. माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे व भानुदास महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.