Ajit Pawar | अजित पवारांचे पालकमंत्री पद तरी टिकणार का?

पुणे: राज्यातील सर्वोच्च ‘मुख्यमंत्री’ पदाला गवसणी घालण्यासाठी पवार आणि त्यांचे कार्यकर्ते उत्सुक असतात. अनेकदा तर भावी मुख्यमंत्री म्हणूनचे बॅनर गावागावात पाहायला मिळतात. मात्र अजित पवारांच्या मुलाचा आणि पत्नीचा निवडणुकीत झालेला पराभव हा अजित पवारांचा राजकीय दबदबा कमी करणारा ठरू शकतो.
कारण अनेकदा जाहीर भाषणात अजित पवार उमेदवाराला चॅलेंज लावून पाडणार असे सांगत असतात. मात्र आता स्वतःच अजित पवार आपल्या पत्नीचा आणि मागील निवडणुकीतील मुलाचा पराभव रोखू शकलेले नाहीत.
राज्यात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असतानाही केवळ अजित पवार ‘महायुती’मध्ये सहभागी झाल्याने हिरावला गेलेला चंद्रकांत पाटील यांचा ‘पालकमंत्री’ पदाचा कारभार अजितदादांकडे राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चाना सुरुवात झाली आहे.
महायुतीत अजित पवार यांच्या वाटेला चार जागा आल्या होत्या. त्यापैकी पक्षाने सर्वाधिक लक्ष बारामतीच्या जागेवरच केंद्रित केले होते. या जागेसाठी अजित पवार शेवटचे काही दिवस बारामतीतील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये अक्षरश: तळ ठोकून होते. मात्र तरीही अजित पवारांना हा विजय खेचून आणता आला नाही.
‘भावी मुख्यमंत्री’ या चर्चेला पुन्हा बळ द्यायचे असेल, तर अजित पवार यांना विधानसभेत ‘आपले नाणे खणखणीत वाजतेय’ हे दाखवून देण्याची हीच वेळ असेल. त्यामुळे पुन्हा एकदा मरगळ झटकून अजित पवार कामाला लागतील अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.