ACB Trap On API | जामिनासाठी मदत करण्यासाठी लाचेची मागणी, सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0

नवी मुंबई : – ACB Demand Trap On API | पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ दाखल करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 40 हजार रुपये लाच स्वीकारताना कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.4) करण्यात आली. (Navi Mumbai ACB Trap)

सहायक पोलीस निरीक्षक सागर कुमार टकले API Sagar Kumar Takle (वय 37), कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस नाईक प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर Pragyesh Narendra Kothekar (वय 42) असे लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीने नवी मुंबई एसीबी कार्यालयात 30 मे रोजी तक्रार दिली होती. टकले आणि कोठेकर दोघेही कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. (Navi Mumbai Bribe Case)

तक्रारदार यांच्या चुलत्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ सादर करण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सागर टकले याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबी कार्य़ालयात जाऊन तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची मंगळवारी (दि.4) पडताळणी केली असता एपीआय सागर टकले याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 40 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. एपीआय सागर टकले याने लाचेची रक्कम पोलीस नाईक प्रज्ञेश कोठेकर याचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार केलेल्या सापळा कारवाई दरम्यान कोठेकर याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शिवराज जगदीश म्हेत्रे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलीस अंमलदार जाधव, अहिरे, मंगेश चव्हाण, माने, चौलकर, महिला पोलीस नाईक बासरे, सावंत, विश्वासराव यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.