Monsoon Rains In Maharashtra | ढगांच्या गडगडाटासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे: Monsoon Rains In Maharashtra | महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस कधी येणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मान्सुन पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पुण्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या सरी पडल्या आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी मॉन्सूनचा केरळमध्येच मुक्काम होता. त्यानंतर रविवारी (दि.२) तिथून मजल थेट तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. गेल्या वर्षी मॉन्सून वेळेवर आला नव्हता, आठ दिवसांचा उशीर त्याला झाला होता. यंदा मात्र सर्व गोष्टी अनुकूल असल्याने मॉन्सूनची वाटचाल अतिशय योग्यरित्या होत आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत बाष्पयुक्त ओलावा येत असून, वाढलेल्या तापमानामुळे दमट व उष्ण वातावरण तयार झाले आहे. परिणामी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये मॉन्सून गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यमी यांनी दिली.