Rasta Roko At Indapur For Khadakwasla Canal Water | इंदापूरमध्ये खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी महामार्गावर रास्तारोको आंदोलन

इंदापूर: Rasta Roko At Indapur For Khadakwasla Canal Water | इंदापूर तालुक्यात पाण्याचा प्रश्न भीषण बनला आहे. इंदापूर तालुक्याला खडकवासला धरणाचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी इंदापूर तालुक्यात डाळज क्र.२ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी पाणी सोडण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
खडकवासला कालव्याच्या लाभ क्षेत्रातील कळस, रुई, न्हावी, निरगुडे, भादलवाडी, अकोले गावातील शेकडो ग्रामस्थ यात सहभागी झाले होते. सुरुवातीला महामार्गालगत उपस्थित संषर्घ समितीच्या सदस्यांची भाषणे झाली.
यामध्ये खडकवासला कालव्याच्या पाण्याबाबत वारंवार इंदापूर तालुक्यावर अन्याय केला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रकल्प सिंचन आराखड्यात मंजुर क्षेत्रापैकी प्रत्यक्ष सिंचित होणारे क्षेत्राचे प्रमाण आठ टक्क्यांवर आले. त्यांनी वापरलेले १० टीएमसी पाणी प्रक्रिया करून इंदापूरातील सिंचनाला उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
कार्यकारी अभियंत्या श्वेता कुऱ्हाडे आंदोलनस्थळी दाखल झाल्या. इंदापूरला पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून, त्यास मंजूरी मिळाल्यावर पाणी सोडले जाईल असे स्पष्टीकरण आंदोलनकर्त्यांना दिले.
यावर पाणी सोडण्याचे आश्वासन आताच द्या, अशी मागणी करत त्यांना धारेवर धरले. या गदारोळात कार्यकारी कार्यकारी अभियंत्या श्वेता कुऱ्हाडे यांनी येथून काढता पाय घेतला. तरीही हे आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते.