Hinjewadi Pune Crime News | पिंपरी : पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल व 6 काडतुसे जप्त

0

पिंपरी : – Hinjewadi Pune Crime News | पाषाण येथील सुस ब्रीज (Pashan Sus Bridge) जवळील डोंगरावर एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन पिस्टल आणि 6 काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई माण फेज 3 व सुस ब्रीज खाली सपाळ रचून करण्यात आली.

अजय शंकर राठोड (वय-31 रा. पाषाण) व जिशान जहीर खान (वय-23 रा. दापोडी मुळ रा. रसलपुर, मुजफ्फर, ता. नगीना, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अवैध धंद्यावर व अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी माण फेज 3 व सुस ब्रीज खाली दोन जण येणार असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. शंकर राठोड याच्याकडून 51 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, दोन काडतुसे व एक होंडा शाईन तर जिशान खान याच्याकडून 87 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, चार काडतुसे व एक मोपेड असा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी एकमेकांचे मित्र असून त्यांनी दोन्ही दुचाकी बावधन व सुस येथून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांची पोलीस कोठडी रिमांडमध्ये अधिक चौकशी केली असता, त्यांनी सुस ब्रीज जवळील डोंगरावर त्यांच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने एका व्यक्तीचे अपहरण केले. त्याला पिस्टलचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैने जबरदस्तीने काढुन घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून 35 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त करुन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आणला आहे. याशिवाय हिंजवडी -4 व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.