Ajit Pawar On Rajya Sabha Election | राज्यसभेसाठी साताऱ्यातून उमेदवार ! अजित पवारांचे सूतोवाच ; कोणाची वर्णी लागणार

मुंबई: Ajit Pawar On Rajya Sabha Election | लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक मुंबईत पार पडली. यात राज्यसभेसाठी साताऱ्यातून उमेदवार दिला जाणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीला दुजोरा दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले, ” मागच्या लोकसभेच्यावेळी ४१ जागा भाजप युतीच्या होत्या, तर विरोधक ७ जागेवर होते. त्यामुळे आपल्याला यंदा जागा कमी मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला साताऱ्यासाठी राज्यसभेची जागा मिळणार असल्याने इतरांनी मागणी करून नये ” असे अजित पवार मेळाव्यात बोलताना म्हणाले.

” लोकसभेत साताऱ्याची जागा भाजपला गेल्याने राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांची जागा रिक्त होणार आहे. त्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्यात येणार आहे.” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान आज झालेल्या बैठकीत अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे लोकसभा जागा वाटपावेळी ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिक्कामोर्तब झाले तर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राज्यसभेचा राजीनामा दिला त्याच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्याला संधी मिळणार आहे.

दरम्यान राज्यसभेसाठी पाठवण्यात येणारा उमेदवार हा सातारा जिल्ह्यातील असणार आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु आहेत. साताऱ्यातून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र जागा भाजपाकडे गेल्याने त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे आता राज्यसभेवर नितीन पाटील यांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरु आहे.