Pune PMC News | नाले, कल्व्हर्ट, पावसाळी गटारे आणि चेंबर्स सफाईचे 90 टक्क्यांहुन अधिक काम पूर्ण

0

पुणे : Pune PMC News | शहरातील व उपनगरातील नाले, कल्व्हर्ट, पावसाळी गटारे आणि चेंबर्सच्या सफाईची जवळपास ९० टक्क्यांहून अधिक कामे पुर्ण झाली आहेत. अवकाळी पावसात रस्त्यावरील पालापाचोळा वाहून येत असल्याने काही ठिकाणी पाणी साचत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा ठिकाणी देखिल पुन्हा स्वच्छतेची कामे करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी दिली.

यंदा शहरात मान्सूनपूर्व पाउस सुरू आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे शहरातील काही ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने ही परिस्थिती होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरातील नाले सफाई, कल्व्हर्ट आणि पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामांची मुदत १५ मे पर्यंत निश्‍चित केली होती. परंतू यानंतरही अद्याप काही ठिकाणी कामे झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाउस होईल असा अंदाज वर्तविला आहे. तसेच मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे देखिल कमी वेळात अधिक पाउस अर्थात ढगफुटी सदृश्य पाउस होत आहे. अशातच शहरातील पावसाळी गटारांची वहनक्षमता कमी असल्याने ढगफुटी सदृश्य पावसात काही रस्त्यांवर अर्धाफुटांहुन अधिक पाणी असते. यातून वाहन चालवताना कसरत करावी लागते यामुळे कोंडीत भर पडते.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले शहर आणि उपनगरात साधारण चारशे कि.मी.चे छोटे मोठे नाले आहेत. जवळपास सर्वच नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. प्रामुख्याने मोठे ओढे आणि नाल्यांच्या सफाईला प्राधान्य देण्यात आले असून आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक स्वच्छता झाली आहे. तसेच सुमारे १७५ कल्व्हर्ट असून त्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. पावसाळी गटारे आणि चेंबर्सची स्वच्छता करण्यात आली असून चेंबर्सवरील जाळ्या सातत्याने स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या रस्त्यांवर अधिक पाणी साठते अशा रस्त्यांवरील चेंबर्सच्या सिमेंटच्या जाळ्या काढून त्याठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.