Supriya Sule | दौंड पुणे मेमुला नव्या बारा बोगी जोडल्या ! खासदार सुळे यांच्याकडून रेल्वे खात्याचे आभार

0

दौंड : Supriya Sule | दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेला आजपासून १२ नव्या बोगी जोडण्यात आल्या आहेत. दौंड ते पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या रेल्वेगाडीची क्षमता त्यामुळे वाढली असून प्रवाशांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. या निर्णयासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेखात्याचे विशेष आभार मानले आहेत.

दौंड ते पुणे दरम्यान नियमित प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार वर्ग, शेतमाल वाहून नेणारे शेतकरी, अन्य छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक तसेच वैद्यकीय कारणासाठी पुण्यात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. हजारोंच्या संख्येने नित्य दौंड ते पुणे आणि पुणे ते पुन्हा दौंड असा प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या सोयीसाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने प्रयत्नशील असतात.

लोकसभेपासून रेल्वे मंत्रालय आणि पुणे विभागीय कार्यालयापासून दिल्ली येथील रेल्वे मुख्यालयापर्यंत खासदार सुळे या पाठपुरावा करत असतात. त्यांनीच केलेल्या पाठपुराव्याला यश येत रेल्वे खात्याने ११ एप्रिल २०२२ पासून या मार्गावर मेमू रेल्वे नियमितपणे सुरू झाली. अनेक वेळा त्यांनी त्यासाठी पत्र, निवेदने देण्याबरोबरच प्रत्यक्ष भेटी घेऊनही आपली मागणी मांडली होती. या सततच्या पाठपुराव्याला यश येत गेली दोन वर्षे मेमू रेल्वे दौंडकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून हजारो प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचत आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून रेल्वे खात्याने आणखी बारा बोगी या गाडीला जोडल्या. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढल्याने प्रवाशांसाठी ही अत्यंत चांगली बाब असल्याचे सांगत सुळे यांनी रेल्वे खात्याचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.