Gas Cylinder Blast In Khed Pune | पुणे : गॅसचा काळाबाजार सुरुच, कंटेनरमधून गॅस चोरी करताना भीषण स्फोट

0

पुणे : – Gas Cylinder Blast In Khed Pune | पुणे शहर आणि जिल्ह्यात गॅस चोरीचे प्रकार सुरु आहेत. आतापर्यंत अनेकदा अशा घटना समोर आल्या असून यामध्ये अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहे. मात्र, गॅस चोरीचा हा गोरखधंदा थांबण्याचे नाव घेत नाही. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावरील (Chakan Shikrapur Road) शेल पिंपळगावमध्ये (Shel Pimpalgaon) आज (रविवार) पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली आहे. कंटेनरमधून ही चोरी सुरु असताना एकामागोमाग एक स्फोट झाले. या घटनेनंतर गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे पसार झाले. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालं आहे.

गॅस स्फोटामध्ये सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. गॅस चा हा काळाबाजार एका लहान ढाब्याच्या समोर सुरु होता. एका कंटेनरमधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी करण्यात येत होती. त्यावेळी गॅसचा स्फोट झाला. तीन ते चार टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथ पार्क केलेल्या इतर वाहनांना देखील मोठी आग लागली. तसेच स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहे. पसार झालेल्या आरोपींचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, मागील वर्षी अशाच प्रकारची घटना पिंपरी चिचंवड (Pimpri Chinchwad ) परिसरात घडली होती. टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. यामध्ये तीन स्कूल बसेस जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरुन गेलं होतं. स्थानिक नागरिक तर भीतीपोटी घर सोडून बाहेर पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आग विझवली. ही आग विझवण्यासाठी दोन तास लागले होते. खेड तालुक्यात घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा गॅस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.