Dindori Lok Sabha | ‘पंतप्रधान आमच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी धार्मिक मुद्द्यावर बोलत राहिले, माझा धीर सुटला आणि…”, तरूणाने सांगितला घटनाक्रम

नाशिक : Dindori Lok Sabha | १५ मे रोजी मी पंतप्रधान मोदींच्या सभेत (PM Modi Sabha In Dindori) सामान्य नागरिक म्हणून उपस्थित होतो. पंतप्रधानांचे भाषण मी काळजीपूर्वक ऐकत होतो. आमच्या प्रश्नांवर ते बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते हिंदू-मुस्लीम आणि धार्मिक मुद्द्यावर बोलत राहिले. १५-२० मिनिटांनी माझा धीर सुटला, त्यामुळे मी त्यांना कांद्यावर बोलण्याची विनंती केली, असा घटनाक्रम किरण सानप या शेतकरी तरूणाने आज नाशिकमध्ये सांगितला.
किरण सानप (Kiran Sanap) यांनी मोदींच्या सभेत त्यांना कांद्यावर बोला, असे म्हणत घोषणाबाजी केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा तरूण शरद पवार (Sharad Pawar) यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी केला होता. खुद्द शरद पवारांनीही या घोषणाबाजीचे समर्थन केले. त्यानंतर आता ज्या तरूणाने ही घोषणाबाजी केली, त्याने त्यामागची पाश्र्वभूमी सांगितली.
आज किरण सानप यांनी शरद पवार यांची नाशिक येथे भेट घेतली. यावेळी किरण सानप यांनी सर्व घटनाक्रम सांगितला.
किरण सानप म्हणाले, मी शरद पवार यांना माननारा कार्यकर्ता आहे. पण ही घोषणाबाजी करण्यासाठी मला कुणीही उद्युक्त केलेले नव्हते. मी एक सामान्य शेतकरी आहे. त्या अनुषंगाने मी स्वयंप्रेरणेने मोदींना कांद्यावर बोलण्यासाठी आग्रह केला.
विशेष म्हणजे सदर तरूण पंतप्रधाना मोदींना कांद्यावर बोला.. कांद्यावर बोला, असे ओरडून सांगत असताना मोदींनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. नंतर या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सभास्थळावरुन बाहेर नेले होते.
या प्रकाराबाबत शरद पवार यांनी आज म्हटले की, नाशिकच नाही तर धुळे, पुणे, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये कांद्याचा प्रश्न उग्र आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. पंतप्रधान मोदी या जिल्ह्यांमध्ये येऊन जर महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालत नसतील तर साहजिकच कुणीतरी प्रश्न विचारणारच.
नाशिकमध्ये हे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधी तर लोकांनी कांदे फेकलेले आहेत. मोदींच्या सभेत घोषणा देणारा जर आमचा कार्यकर्ता असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे पवार म्हणाले.