Guardian Giripremi Institute of Mountaineering (GGIM) | पांगरचुला व सुंदरू खोऱ्यातील हिम शिखरांवर शालेय विद्यार्थ्यांची यशस्वी चढाई (Video)

पुणे : पुण्यातील गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरींग Guardian Giripremi Institute of Mountaineering (GGIM) मार्फत १० ते १६ या वयोगटातील लहान मुलांसाठी आव्हान निर्माण उडान हा पाच वर्षांचा आऊटडोअर एज्युकेशन आणि गिर्यारोहण या विषयावरील अभ्यासक्रम राबविला जातो. या वयोगटातील मुलांनी शालेय शिक्षणासोबतच निसर्ग, गिर्यारोहण, झाडे, फुले, प्राणी, पक्षी, हवामान, इतिहास भूगोल, शारीरिक शिक्षण, व्यवहार ज्ञान, वेगवेगळ्या प्रदेशातील खाद्य पदार्थ, बोली भाषा, तिथली संस्कृती या सर्व बाबींचा अनुभव घेणे हा या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. गिरिप्रेमी या अग्रगण्य गिर्यारोहण संस्थेतील गिर्यारोहक हे या मुलांना महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर, डोंगर दर्यांमध्ये तसेच हिमालयातील पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देतात.

या उपक्रमाअंतर्गत ही मुले वर्षभर सह्याद्रीतील गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करतात, गिर्यारोहण म्हणजे काय ते समजून घेतात आणि मे महिन्याच्या सुट्टीत हिमालयातील वेगवेगळ्या पर्वतरांगांमध्ये १० दिवसांकरिता हिमालय ॲडव्हेंचर कोर्स पूर्ण करतात. या वर्षीच्या कोर्समार्फत २७५ हून अधिक विद्यार्थ्यांनी हिमालयातील पाच वेगवेगळे ट्रेक पूर्ण केले. पहिले वर्ष म्हणजे आव्हान मधील मुलांनी मनाली (हिमाचल प्रदेश) येथील ८,५०० फूट उंचीचा तीलगुन मिडोस ट्रेक; दुसरे वर्ष म्हणजे आव्हान ॲडव्हांस मधील मुलांनी नग्गर हिमाचल प्रदेश येथील ११,६०० फूट उंचीवरील राणी सुई लेक ट्रेक; तिसरे वर्ष म्हणजे निर्माण मधील मुलांनी खाती, उत्तराखंड येथील १२,००० फूट उंचीवरील पिंडारी ग्लेशियर ट्रेक; चौथे वर्ष म्हणजे निर्माण ॲडव्हांस मधील मुलांनी १४,३०० फूट उंचीच्या पांगरचुला शिखरावर यशस्वी चढाई केली; तर उडान या अंतिम वर्षातील मुलांनी शिमला, हिमाचल प्रदेश येथील १४,८०० फूट उंचीवरील आजवर जास्त कोणीही न केलेला सुंद्रू व्हॅली हा अत्यंत कठीण ट्रेक पूर्ण केला.

पांगरचुला शिखर चढाई व शिमला येथील सुंद्रू व्हॅली ट्रेक या दोन मोहिमांमध्ये मुलांचा विशेष कस लागला. अतिउंचीवरील उणे अंश सेल्सिअस तापमान, जोराने वाहणारे वारे, पांढऱ्या शुभ्र बर्फावरून परावर्तित होणारा प्रखर सूर्यप्रकाश अशा अनुकूल परिस्थितीत सुद्धा या मुलांनी मागील तीन ते चार वर्षात मिळालेल्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाच्या बळावर आणि महत्वाचे म्हणजे शारीरिक तयारीसोबताच मानसिक तयारी दाखवत हिमालयामध्ये आपला कस आजमावत शिखरमाथा गाठला.

या पाच वर्षांमध्ये ही सर्व मुले कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वातावरणात ट्रेक करण्यासाठी तसेच कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार झाली आहेत. यासाठी गिरिप्रेमी व जी. जी. आय. एम. मधील विवेक शिवदे, स्वाती कडू, मिहिर जाधव, वरुण भागवत, यश हांगे, ऐश्वर्या राजगोपाल, सुयश मोकाशी, आशिष नावंधर, जयंत तुळपुळे, सुमिता तुळपुळे, अक्षय भोगडे, समीर दिवेकर, दत्तात्रय चौधरी, तनवी चव्हाण, अंजली केळकर, ओंकार भेलके, अजिंक्य उगावकर, शालोमी कुकडे, साक्षी प्रभुणे, समृद्धी ढमाले, रश्मी गुप्ता, कोमल सुखानी, किशोर चौधरी, राहुल सोनके, कृतार्थ शेवगावकर, विकास भोंडवे, अंजली कात्रे, प्रमिला पोटे, जयसिंह देशमुख, साहिल फडणीस, अजिंक्य मांजरे, ईशा इनामदार, या सर्व गिर्यारोहक प्रशिक्षकांचाही मोलाचा वाटा आहे.