Basav Seva Pratishtan Pune | ‘बसव विचार आचरणात आणणे गरजेचे’ ! लिंगायत तत्वज्ञान अभ्यासक किरण कोरे यांचे प्रतिपादन


पुणे : Basav Seva Pratishtan Pune | महात्मा बसवण्णा लोकशाहीचे जनक आहेत. त्यांनी बाराव्या शतकात अनुभव मंटप स्थापन करून लोकशाहीची बीजे रोवली. बसव विचार केवळ विशिष्ट समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे कल्याण करणारे आहे. असे हे बसव विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते व लिंगायत तत्वज्ञान अभ्यासक किरण कोरे यांनी पुणे येथे केले.
बसव सेवा प्रतिष्ठान, पुणे तर्फे जाधवनगर, वडगाव बुद्रुक येथील जैन मंदिरामध्ये मंगळवारी बसव जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात कोरे बोलत होते. यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मलशेट्टी, नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते, रविंद्र खुबा, राष्ट्रीय बसव दलचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील, जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस बसवराज कनजे, चंद्रकांत हरकुडे, संजय इंडे, शिवानंद पाटील, नागेश इंडे, बाळासाहेब होनराव, शिवा इंडे, संगमेश खूबा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कोरे यांना बसव प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरे म्हणाले की, विश्वगुरू महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकात संपूर्ण जगाला लोकशाही तत्व दिले. त्यावेळी अनुभव मंटप सुरू केला. ज्याला आपण आत्ताची संसद म्हणू शकतो. या अनुभव मंटपात 700 पुरूष आणि 70 स्त्रीया होत्या. पुरूषांबरोबर महिलांनाही बोलायचा, आपले मत मांडायचा अधिकार बसवण्णांनी दिला होता. याच अनुभव मंटपात समाजातील वेगवेगळ्या विषयांवर, समस्यांवर चर्चा व्हायच्या. ज्यातूनच मानवासाठी कल्याणकारी असे वचन साहित्य निर्माण केले गेले. हे वचन साहित्य सर्वांनी वाचून आचरणात आणण्याची गरज आहे. असे मत ही कोरे यांनी व्यक्त केले.

मंगळवारी सकाळी प्रतिष्ठानतर्फे रक्तदार शिबीर आयोजित करण्यात आले होते ज्यात तब्बल 40 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यात तीन महिलांचा समावेश होता.
सायंकाळी कार्यक्रमाची सुरूवात बसव पूजनाने करण्यात आली. लहान मुलांनी वचनांवर आधारित नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. आशुतोष संकेय पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केले. त्यानंतर सन्माननीय मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र खुबा यांनी केले.