Pune PMC News | नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या 80 टक्के पथारी व्यावसायीकांनी महापालिकेचे 56 कोटी भाडे थकविले

PMC

पुणे : Pune PMC News | महापालिकेने पुर्नवसन केलेल्या तब्बल ८० टक्के पथारी व्यावसायीकांनी २०१८ पासून महापालिकेचे ५६ कोटी १७ लाख रुपये भाडे थकविले आहे. ही थकबाकी न भरल्यास महापालिकेच्यावतीने Pune Municipal Corporation (PMC) परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही तसेच परवाने देखिल रद्द करण्यात येतील, असा इशारा अतिक्रमण विभागाने दिला आहे.

महापालिकेने १२ हजार ११३ नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांचे पुनर्वसन केले आहे. या व्यावसायीकांकडून झोननिहाय भाडे आकारण्यात येते. यापैकी तब्बल ९ हजार ८५२ व्यावसायीकांनी २०१८ पासून महापालिकेला भाडेच दिलेले नाही. मूळ भाडे आणि थकबाकीवरील दंडाची आकारणी असे तब्बल ५६ कोटी १७ लाख रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडे थकलेली आहे. ही रक्कम भरली नाही तर परवाना नूतनीकरण केले जाणार नाही, प्रसंगी परवाने देखिल रद्द करण्याचा इशारा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिला आहे.

    पथारी व्यावसायीक धोरणानुसार महापालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये नो हॉकर्स झोन तसेच काही महत्वाच्या रस्त्यांवरील नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांचे पुनर्वसन केले आहे. नोंदणीकृत पथारी व्यावसायीकांकडून व्यावसायीक झोननुसार भाडे आकारणी करण्यात येते. भाडे न भरल्यास दंडही आकारण्यात येतो. दरम्यान, २०२० मध्ये आलेल्या कोरोनामुळे संपुर्ण पथारी व्यवसायीक अडचणीत आले. लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद राहील्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले. साधारण २०२१ च्या उत्तरार्धात व्यवसाय सुरू झाले. कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेनेही वसुलीसाठी तगादा लावला नाही. तसेच थकबाकी हप्त्यांमध्ये देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती.  परंतू यानंतरही अनेकांनी थकबाकी भरली नाही, असे महापालिकेचे अधिकारी सांगतात.