Pune Police News | मुंढवा पोलिसांनी जपली माणुसकी! पोलिसांनी घडविली आई-मुलाची तब्बल 12 वर्षानंतर भेट

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करुन मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून घरात कोणालाही काहीही न सांगता घर सोडले अन् तो पुण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही. नैराश्य आल्याने तो राहत्या भाड्याच्या खोलीतून निघून गेला. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेऊन मुलाची आणि त्याच्या आईची तब्बल बारा वर्षानंतर भेट घडवून आणली. संतोष कमलाकर पैठणे (वय-38 रा. मु.पो. काटोडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे या मुलाचे नाव आहे. तो स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी 2012 मध्ये पुण्यात आला होता. (Pune Police News)

संतोष पैठणे हा त्याच्या गावी लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याच्या मनात पुण्यात जाऊन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र, घरातील आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची व बिकट होती. आडाणी आई-वडिल मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करत होते. त्यामुळे त्यांनी मुलाला पुण्याला जाण्यासाठी विरोध केला. 2012 मध्ये घरात कोणास काहीही न सांगता संतोष घरातून निघून पुण्यात आला.

पुण्यात आल्यानंतर त्याने पार्ट टाईम काम करुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याने महाराष्ट्र लोकसेवा तसेच राज्यसेवा अंतर्गत वेगवेगळ्या पदाकरिता परीक्षा दिल्या. मात्र, स्पर्धा परीक्षा मध्ये कोणतेही पद निघत नसल्याने व वारंवार अपयश येत असल्याने संतोषला नैराश्य आले. याच काळात तो मुंढवा येथील रेल्वे ब्रिजच्या शेजारी उज्वला शिवाजी पवार यांच्याकडे 2017 पासून भाड्याने राहत होता.

15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहाच्या सुमारास संतोष हा राहत्या भाड्याच्या खोलीतून काहीएक न सांगता निघून गेला. त्यामुळे मुंढवा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीचे तांत्रीक विश्लेषण करुन मुंढवा पोलिसांनी संतोषचा शोध घेतला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, 2012 मध्ये घरात कोणाला काहीही न सांगता स्पर्धा परिक्षेकरिता पुण्यात आलो होतो. परंतु मला स्पर्धा परिक्षेत यश संपादन न झाल्याने नैराश्य आले.

संतोषचे नैराष्य व कुटूंबापासूनचा दुरावा याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी मुलाच्या मुळगावी सरपंच व आई-वडिलांना संपर्क करुन माहिती दिली. त्यावेळी पहिल्यांदा त्यांना विश्वासच बसला नाही, त्यांनी वारंवार विचारणा करून खात्री करून घेतली. सरपंच व आई-वडील यांना मुंढवा पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

संतोषचे वडील कमलाकर धोंडू पैठणे (वय-65) व आई कांताबाई कमलाकर पैठणे (वय-58) हे मुंढवा पोलीस ठाण्यात आले. 12 वर्षापासून आपल्यापासून दूर असलेल्या मुलाला पाहून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले. तब्बल एका तपानंतर आई-वडिल आणि मुलाची गळाभेट झाल्याचे पाहून पोलिसांच्या देखील डोळ्यात अश्रू आले. मुंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे 12 वर्षापासून बेपत्ता असलेला मुलगा परत मिळाल्याने काटोडा गावचे सरपंच प्रदीप ढिगळे, संतोषचे आई-वडिल व इतर नागरिकांनी पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस अंमलदार महेश पाठक, दत्ता जाधव, दिनेश भांदुर्गे, योगेश गायकवाड, हेमंत पेरणे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.