ज्योतिरादित्य सिंधिया PM मोदींच्या भेटीला

Jyotiraditya Scindia
10th March 2020

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी आले असून त्यांच्या समवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. आज माधवराव सिंधिया यांची ७५ वी जयंती आहे. याच दिवशी त्यांचे पुत्र भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

ज्योतिरादित्य प्रथम गुजरात भवन येथे आले. त्यांच्या पाठोपाठ अमित शहाही तेथे आले. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.  राहुल गांधीचे उजवे हात म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया ओळखले जातात. तेच भाजपत  जात असल्याने काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का आहे.  मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले. तेव्हापासून आपल्याला डावलले गेल्याची भावना ज्योतिरादित्य सिंधिया यांची झाली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे, अशी त्यांची अपेक्षा होती. असे असताना ते कमलनाथ यांच्याकडे गेले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा इच्छा काँग्रेस पक्षश्रेष्ठीची होती. मात्र, त्यांनी ते नाकारले होते.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी देऊन मध्य प्रदेशाच्या राजकारणातून त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न झाला होता. गुना या आपल्या पारंपारिक मतदारसंघात त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली होती. तेव्हापासून ते नाराज होते. त्यांची ही नाराजी भाजपने पुरेपुर ओळखून त्यांना खासदारकी व केंद्रात मंत्रीपदाचे आमिष दाखविले आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे.