रेल्वेत ३ लाख पदांसाठी भरती, सरकारने दिली माहिती

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. विशेषत: ज्यांना रेल्वेची नोकरी हवी त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेत ३ लाख रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे.
हजारो पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून रेल्वे भरती बोर्डाकडून लागोपाठ या भरतीच्या सूचना जारी केल्या जात आहेत. या भरतीबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली आहे. शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेत एकुण पदांची संख्या १५ लाख २४ हजार १२७ आहे. यातील १२ लाख १७ हजार ९०० पदे यापूर्वीच भरलेली आहेत. तर ३ लाख ६ हजार २२७ पदे अद्याप भरायची आहेत. यातील सुमारे २.९४ पदांच्या भरतीसाठी रेल्वेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार २.९४ लाख पदे भरण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाद्वारे सात अधिसूचना काढण्यात आल्या आहेत. ज्यावर अर्ज आणि भरती प्रक्रिया सुरू आहे. तर काही अधिसूचनांवर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. याद्वारे निवडलेल्या ९०,८९० उमेदवारांनी कार्यभार स्वीकारला आहे, अथवा स्वीकारणार आहेत.
यासह ६०१ राजपत्रित पदांवरही नियुक्तीसाठी लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आली आहेत. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, २०१९-२० मध्ये सुमारे ४७ हजार रेल्वे कर्मचारी निवृत्त होत आहेत. तर २०२०-२१ मध्ये सुमारे ४१ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतील. २०२१पर्यंत रेल्वेत पुन्हा सुमारे १ लाख पदे खाली होतील.
visit : npnews24.com