पंकजा मुंडे अन एकनाथ खडसे अहंकारी नेते; संघाने सुनावले

Pankaja Munde
14th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ज्येष्ठनेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर टिका केली होती. यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता या दोन्ही नाराज नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया येऊ लागल्या असून संघाचे मुखपत्र असलेल्या दैनिक तरूण भारतने या नेत्यांना अहंकारी म्हणत आत्मपरिषण करण्याचा सल्ला दिला आहे.

संघाच्या मुखपत्रात म्हटले आहे की, अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का, स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही. पंकजा मुंडे आणि नाथाभाऊ खडसे यांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचे जाणवले नाही.

रोहिणी आणि पंकजा मुंडेंच्या पराभवाचे शल्य मनात ठेवूनच हे दोघेही बोलले. आपल्या पराभवाचे खापर या दोघांनीही, पक्षनेतृत्वावर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर आणि अप्रत्यक्षपणे मोदी-शाह या दिग्गज नेत्यांवर फोडले. मी पक्षासाठी झिजलो, झटलो. पक्षाला खूप काही दिले, असे एकनाथ खडसे म्हणाले. तर पंकजा म्हणाल्या, माझ्या वडिलांनी पक्षाला खूप काही दिले. या दोघांच्या दाव्यात कणभरही अतिशयोक्ती नसली तरी दोघेही हे विसरले की, पक्षानेही तुम्हाला जे दिले, ते जनताही लाखो डोळ्यांनी बघत असते.

आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असे नामाभिधान लावून घेतो किंवा मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते राजकीयदृष्ट्या अयोग्य  असेच होते, असे म्हणत संघाने या दोन्ही नेत्यांना चुकीचे ठरवले आहे.

काय म्हटले आहे मुखपत्रात
* आपण ज्यांना नेता मानतो ती माणसे, एका साध्या पराभवाने किती सैरभैर होतात, याचे दिग्दर्शन मात्र सर्वसामान्य कार्यकत्र्यांना या मेळाव्यात झाले.

* पंकजा मुंडे चळवळीतून किंवा संघर्षातून पुढे आल्यात, असा काही इतिहास नाही. वडिलांची पुण्याईच इतकी प्रचंड होती की, त्याचा त्यांना अनासायास लाभ मिळाला. परंतु, पुण्य नेहमीच झपाट्याने कमी होत असते.

* आपल्यामुळे कुणावरही अन्याय झाला नाही, कुणीही दुखावले गेले नाही, पक्षातील कुणाचीही गळचेपी झाली नाही, असे नाथाभाऊ तरी छातीठोकपणे सांगू शकतील का?

* या दोघांनीही बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात. समजा, एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?

visit : npnews24.com