आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, १६ डिसेंबरपासून NEFT सुविधा २४ तास

0

नवी दिल्ली :  एन पी न्यूज 24 – बँकिंग, रस्ते परिवहन आणि दूरसंचार क्षेत्रात ग्राहाकांशी संबंधित अनेक नवे बदल १५ आणि १६ डिसेंबरपासून लागू होत आहेत. तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर लक्षात ठेवा की, आज रात्री १२ वाजतानंतर सर्व टोलनाक्यांवर फास्टटॅग व्यवस्था लागू होत आहे. सोमवारपासून ट्रायचे नवे नियम लागू होतील, यात तीन दिवसात मोबाईल क्रमांक पोर्ट होऊ शकतो. तर १६ डिसेंबरपासून एनइएफटीची सुविधा २४ तास मिळणार आहे.

आज रात्रीपासून फास्टटॅग व्यवस्था
फास्टटॅग व्यवस्थेला जर पुन्हा मुदतवाढ दिली गेली नाही तर सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर १५ डिसेंबर म्हणजेच १४ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजतानंतर ही व्यवस्था लागू होणार आहे. जर फास्टटॅग नसलेली वाहने फास्टटॅगच्या लेनमध्ये आली तर त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. सध्या राष्ट्रीय महार्गांवर एक संमिश्र लेन असेल, ज्यामध्ये फास्टटॅग नसलेल्या वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे.

आयसीआयसीआयच्या ग्राहकांना भुर्दंड
आयसीआयसीआय बँक १५ डिसेंबरपासून ग्राहकांना केवळ चार वेळा रोख रकम भरणे आणि जमा करण्याची सुविधा देणार आहे. त्यानंतरच्या व्यवहारावर १५० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मुख्य शाखेत निशुल्क पैसे जमा करणे आणि काढण्याची मर्यादा दोन लाख रूपयांपर्यंतच असणार आहे.  त्यानंतर प्रति हजार रूपये ५ रूपये शुल्क लागू होणार आहे. यातही कमीत-कमी शुल्क १५० रूपये असेल.

मोबाईल क्रमांक ३ दिवसात पोर्ट
१६ डिसेंबरपासून नवीन नियमांनुसार ग्राहक तीन कामकाजाच्या दिवसांत आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करू शकतात. अन्य सर्कलमध्ये मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी पाच दिवसांची मुदत असणार आहे. सध्या यासाठी १५ ते २० दिवस लागतात. परंतु, पोर्टकोड काही अटींवर मिळणार आहे. ग्राहकाजवळ कमीतकमीत ९० दिवसांचे सक्रिय कनेक्शन असणे गरजेचे आहे. तसेच सर्व बील चुकते केलेले असणे आवश्यक आहे.

२४ तास एनइएफटी सेवा
बँका सोमवारपासून २४ तास एनइएफटी करू शकतात. म्हणजेच केव्हाही ऑनलाईन पैसे पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. १५ डिसेंबरच्या रात्री १२.३० पासून ही सुविधा सुरू होणार आहे. सध्या सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंतच ही सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वीच एनइएफटी-आरटीजीएसवरील शुल्क बंद करण्यात आले आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.