रतलाम : एन पी न्यूज 24 – मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील प्रत्येक पाचव्या घरात कॅन्सरचा रूग्ण आढळून आला आहे. मागील पाच वर्षात कॅन्सरमुळे गावातील ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाला समजताच प्रशासनाची धावपळ उडाली आहे. तातडीने गावात तज्ज्ञांचे एक पथक दाखल झाले आहे.
या गावाचे नाव भोजाखेडी असे आहे. गावात सुमारे २०० कुटुंबं आहेत. तर लोकसंख्या जवळपास १९०० आहे. गावातील ३५ लोकांचा मागील पाच वर्षात कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. आजही अनेक लोक कॅन्सरने पीडित आहेत. एवढेच नव्हे, तर गावच्या महिला सरपंचासह जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्षही कॅन्सरग्रस्त आहेत.
आयआयएम इंदोरच्या ४८ विद्यार्थ्यांचा एक गट जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन याविषयाचा अभ्यास करण्यासाठी आला होता. १४ ऑक्टोबरला भोजाखेडीमध्ये या विद्यार्थ्यां चा एक गट वस्तीला होता. यावेळी या भयंकर रोगाबाबतचा खुलासा झाला.

विद्यार्थ्यांच्या या गटाने एक अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पाण्यात काहीतरी दोष असल्यामुळे गावातील लोक कॅन्सरला बळी पडत असावेत, अशी शंका या अहवालात विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. यानंतर हातपंप आणि विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

