बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता दरवाजे उघडे करुन बसू नका

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – शिवसेनेने साद दिली तर भाजपाची दारे आजही खुली आहेत असे विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपाला पुन्हा एकदा फटकारले आहे. आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका. बाळासाहेबांचे फोटो लावूनच भाजपा वाढली. आम्ही स्वतंत्रपणे लढलो असतो तर १०० च्या वर जागा जिंकल्या असत्या. जी भूमिका मिळाली आहे ती निभवा, असे राऊत यांनी सुनावले आहे.

शिवसेना आणि भाजप विभक्त झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये रोजच्या रोज कलगी-तुरा रंगत आहे. मात्र, काल देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला पुन्हा चुचकारण्याचा प्रयत्न केला असताना राऊत यांनी मात्र फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत. यामुळे भाजपा-शिवसेनेतील तणाव कमी होताना दिसत नाही.

फडणवीसांच्या विधानावर एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना राऊत यांनी म्हटले की, फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यांच्याकडून विरोधी पक्षाच्या अपेक्षा आहेत. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे. आम्ही पुढे आलो आहोत. विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करा.

महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना राऊत म्हणाले, राज्य सरकार चालले आहे. बैलगाडीला कमी लेखू नका.  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार कासवाच्या गतीने पुढे जाईल पण टप्पा पार करेल. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावरही टीका केली जाते, भारत ५ वर्षात उभा राहिला नाही तर गेल्या ६० वर्षापासून देशात काँग्रेसचे योगदान आहे. पंडित नेहरु, महात्मा गांधी, वीर सावरकर यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. कोणावरही टीका करुन कुणी मोठे होत नाही, असे राऊत म्हणाले.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.