मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपाचे अनेक बडे नेते नाराज असून ते आमच्या संपर्कात आहेत. तसेच जे नेते राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेले होते ते आमदारदेखील आमच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नवाब मलिक यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केलेल्या मेगाभरतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपामध्ये गेले होते. तसेच विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाचे अनेक बडे नेते पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत. यापैकी काही नेते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे भाजपात बंडखोरी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. यावर नवाब मलिक यांनी वरील प्रतिक्रिया दिली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर असे नवाब मलिक म्हणाले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काल गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर टिका केली. यामुळे राज्यातील भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्ष माझ्या बापाचा आहे, मी बंडखोरी का करू? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. याचेवळी एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वावर उघडपणे टिका करत, पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असे सांगत पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.
visit : npnews24.com