ऑनर किलिंग : कल्याण खाडीत सापडले मुलीचे शिर नसलेले धड

Honor Killing
13th December 2019

कल्याण : एन पी न्यूज 24 – अन्य धर्मातील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने बापानेच मुलीची अत्यंत निदर्यीपणे हत्या केल्याचा थरारक प्रकार कल्याण येथे उघडकीस आला आहे. अरविंद तिवारी (४७) असे मुलीच्या वडीलांचे नाव असून मुलीचे नाव प्रिन्सी (२२) आहे. अरविंद तिवारी याने मुलीची निर्घृण हत्या करून तिचा शिर नसलेला मृतदेह कल्याण खाडीत फेकून दिला होता. पोलीसांना प्रिन्सीचे शिर नसलेले धड सापडले असून शिर अद्याप सापडलेले नाही.

मृत पिन्सी ही तिचे वडील अरविंद यांच्यासोबत टिटवाळ्यातील इंदिरानगर येथे राहत होती. बारावीपर्यंत शिकलेली प्रिन्सी मुंबईतील भांडुप येथे काम करत होती. तिचे अन्य धर्मातील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने अरविंदने या रागातून तिची ६ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या केली. या नराधम बापाने मुलीच्या शरीराचे तीन तुकडे करुन वरचा भाग आणि शीर कल्याणच्या खाडीत फेकले. परंतु, एका रिक्षाचालकामुळे अरविंदचे हे कृत्य उघडकीस आले आणि तो सापडला.

चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार कल्याण खाडीत पोलिसांनी अग्नीशामक दल व कोळीबांधवांच्या मदतीने बुधवारी सकाळी नऊवाजता शोधमोहीम सुरू केली. चार तासाच्या प्रयत्नानंतर ३ किलोमीटर अंतरावर प्रिन्सीचे शीर नसलेले धड सापडले. तर शीर शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलीसांनी प्रिन्सीच्या प्रियकराचीही चौकशी केल्याचे समजते. तसेच मृत मुलीची आई उत्तरप्रदेश येथून कल्याणला येण्यासाठी निघाली असून तिच्याकडूनही महत्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे. प्रिन्सीचे अन्य धर्मातील मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर अरविंद तिच्यावर पाळत ठेवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

visit : npnews24.com