स्थानिक पातळीवरही शिवसेना-भाजपचा घटस्फोट? औरंगाबादेतून सुरुवात

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी नवा घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली. हे तीन पक्ष एकत्र आल्याने भाजप-शिवसेना रोजच्यारोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टिका करत आहेत. अनेक वर्षे एकत्र नांदल्यानंतर विभक्त झालेले हे दोन पक्ष स्थानिक पातळीवर आजही अनेक ठिकाणी सत्तेत आहेत. परंतु, येथेही त्यांची युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादेत भाजपने महापालिकेत शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेऊन यास सुरुवात केली आहे.

राज्यात आपला प्रतिस्पर्धी फक्त शिवसेनाच आहे, असे भाजपने निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवरही हे दोन पक्ष घटस्फोट घेऊन नवा घरोबा करू शकतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुक लढवली असल्याने त्यांची सत्ता निश्चित येणार होती. परंतु, पाच वर्षात भाजपने सतत डावलले आणि अन्याय केल्याचा आरोप करत शिवसेनेने ऐन मोक्यावर भाजपची साथ सोडली. त्यानंतर अनेक राजकीय नाट्य राज्यात घडली. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यावरून भाजपा दुखावली गेल्याचे दिसत आहे.

दुखावलेल्या भाजपने मुंबई महापालिकेत आमचाच महापौर असेल असे म्हणत शिवसेनेला आव्हान देण्यास सुरूवात केली आहे. अनेक वर्षे राज्यात शिवसेना-भाजपची महायुती असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हे दोन पक्ष सत्तेत आहेत. मात्र, आता हे दोन्ही पक्ष राज्यपातळीवर विभक्त झाले असल्याने स्थानिक पातळीवरही याचा परिणाम होणार आहे. जनता प्रश्न विचारत असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेसोबत असलेल्या युत्या तोडण्याच्या तयारीत भाजप आहे. औरंगाबाद महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत, या ठिकाणी ते विभक्त होऊ शकतात. भाजप-शिवसेनेने अशाप्रकारे स्थानिक पातळीवरही काडीमोड घेतल्यास अनेक महापालिका, नगरपरिषदा, पं.स., जि.प.मध्ये विरोधीपक्षात बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा मात्र, फायदा होणार आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.