रेल्वेची करामत ! ५४५७ उंदरांना मारण्यासाठी खर्च केले १.५ कोटी रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उंदीर मारण्याच्या सापळ्यात आता भारतीय पश्चिम रेल्वे प्रशासन अडकण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे परिसरातील उंदीर मारण्याचे औषध टाकण्यासाठी तीन वर्षांत १ कोटी ५२ लाख ४१ हजार ६८९ रूपये खर्च करून ५ हजार ४५७ उंदीर मारल्याचा खुलासा, माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पश्चिम रेल्वेने केला आहे. पश्चिम रेल्वे, हा भारतीय रेल्वेचा सर्वात छोटा झोन असून तो प्रामुख्याने पश्चिम भारत ते उत्तर भारत जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांचे संचालन करतो.
आरटीआयमधून उघड झालेली ही आकडेवारी पाहता रेल्वेने यार्ड आणि रेल्वे कोचमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकण्यासाठी तीन वर्षात प्रतिदिन १४ हजार रूपये खर्च केले आहेत. एवढी रक्कम खर्च करूनही प्रतिदीन फक्त ५ उंदीर मारण्यात आले आहेत. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अधिक खुलासा करताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भास्कर यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारे एकुण खर्च आणि मारले गेलेले उंदीर असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. आपण काय मिळवले हा आकडा सांगता येत नाही. या सर्व फायद्यांमध्ये असेही आहे की, मागील दोन वर्षात उंदरांनी तार तोडल्याने सिग्नल फेल होण्याच्या घटनासुद्धा कमी झाल्या आहेत.