अवघ्या तीन तासात पुन्हा फुलले पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पोस्टरवर कमळ !

0

बीड : एन पी न्यूज 24 – स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा होणार आहे. तसेच गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ गायब झाल्याची चर्चा सर्व झाल्यानंतर अवघ्या तीन तासात पोस्टरवर पुन्हा कमळ फुलल्याचे दिसून आले आहे.

राज्यातील भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एकनाथ खडसे व अन्य काही नेत्यांसह पंकजा मुंडेसुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. काही नेत्यांनी उघडपणे तर काहींनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर उद्या होत असलेल्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या मेळाव्याचे हजारो पोस्टर सर्वत्र लागले होते. मात्र या पोस्टरवरून भाजपचे चिन्ह असलेले कमळ गायब झाले होते. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले असता, इतके दिवस थांबलात, तर आणखी एक दिवस थांबा, असे सूचक उत्तर त्यांनी दिले होते. परंतु, ही चर्चा सर्वत्र सुरू झाल्यानंतर चक्र कशी फिरली हे समजले नसले तरी पंकजा मुंडेंच्या पोस्टरवरून गायब झालेले कमळ पुन्हा फुलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.