महाविकास आघाडीबाबत मनसेने केले ‘हे’ भाष्य; आगामी निवडणुकांची रणनीती ठरली

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. सरकारच्या विश्वासदर्शक ठरवातही मनसेचा एक आमदार तटस्थ राहिला होता. मात्र, आज प्रथमच राज्यातील सरकारबाबत मनसेने भाष्य केले आहे. मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक राजगड येथे पार पडल्यानंतर नेते बाळा नांदगावकर यांनी हे भाष्य केले आहे.

या बैठकीबाबत माहिती देताना नांदगावकर म्हणाले की, धुळे, औरंगाबाद, बदलापूर, कल्याण-डोंबिवली व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला असून पुढे काय करायचे याची रणनीती ठरविण्यात आली आहे. राज्यातील तीन पक्षांच्या सरकारबाबत नांदगावकर म्हणाले, महाविकास आघाडीकडे आम्ही तटस्थ भूमिकेतून पाहत आहोत. विचारधारा सोडून दुसरीकडे वळणे हे लोकांना न पटणारे आहे. जे काही झाले ते लोकांना फारसे पटणारे नाही. या पुढील जो काही निर्णय असेल तो राज ठाकरे लवकरच घेतील. अनेक ठिकाणी लोकांनी मनसेच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले आहे.

या लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणूनच पुढील निर्णय घेणार आहोत, असे नांदगावकर म्हणाले. या बैठकीत पक्षाच्या पुढील महाअधिवेशनावरही चर्चा करण्यात आली. यावेळी नांदगावकर यांच्यासह जयप्रकाश बाविस्कर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.