बलात्काराचा खटला १५ दिवसांत निकाली, आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा

11th December 2019

हैदराबाद : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन कायदा अमलात आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन करताना याबाबतचे संकेत मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी सभागृहात दिले आहेत. सरकार महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असून निष्काळजीपणा चालणार नाही. त्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात येणार आहेत, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

जगमोहन सरकारने या कायद्यासाठी तयारी सुरू केली असून नवीन कायद्यात महिलांवरील बलात्काराच्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असेल. भारतीय दंड संहिता, कलम ३५४ मध्ये सुधारणा करुन नवीन कलम ३५४ ई लागू करण्यात येईल. या नवीन कलमानुसार महिला आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचार आणि हल्ला करणारांना जलदगतीने शिक्षा देण्यात येईल. काही आठवड्यांतच खटल्यावर फास्टट्रॅक सुनावणी होईल. केवळ १५ दिवसांत खटला निकाली काढण्याची तरतूद या कायद्यात असेल. दोषींना ३ आठवड्यांत शिक्षा देण्याचीही तरतूद या कायद्यात असणार आहे.