समृद्धी महामार्गाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – समृद्धी महामार्गाच्या नावावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची केलेली मागणी मागे पडली असताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही झाली आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर आता कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग मुख्य मानबिंदू ठरणार आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर मुंबई दादर येथील चैत्यभूमी ही डॉ. आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. चैत्यभूमी व दीक्षाभूमी ही दोन्ही बहुजन समाजाची श्रद्धास्थाने असून या धार्मिक स्थळाला राज्यातून, देशातून हजारो लोक भेट देत असतात. त्यामुळे १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.