नाशकात सैराटचा थरार…बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या रागातून केला प्रियकराचा खून

11th December 2019

नाशिक : एन पी न्यूज 24 – बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात असल्याने भावाने मित्रांच्या मदतीने प्रियकर तरुणाची हत्या केल्याची घटना नाशकातील डिंगरअळी, संभाजी चौक परिसरात घडली आहे. विवेक सुरेश शिंदे (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी सुशांत वाबळे, शंभू गोरख जाधव, शिवा गोरख जाधव हे फरार झाले असून त्यांच्या शोध पोलीस घेत आहेत.

विवेक सुरेश शिंदे हा मित्र ओम राजेंद्र हादगेसोबत दुचाकीवरुन रात्री १२ वाजता घरी येत असताना संशयित सुशांत वाबळे, शंभू जाधवसह दोनजणांनी त्यांना अडवले. यावेळी ओम हादगेने रोहन शिंदे या मित्रास फोन करून ही घटना सांगितली. नंतर दोघांनी कशीबशी सुटका करून घेत तेथून पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याना संभाजी चौकाजवळील ऊर्दू शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पुन्हा गाठून विवेकवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या विवेकला प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिका‍ऱ्यांनी विवेकला मृत घोषित केले. याप्रकरणी विवेकचे भाऊ रोहन सुरेश शिंदे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजनकुमार सोनवणे करत आहेत.

या प्रेमसंबंधातून शिंदे आणि जाधव कुटुंबामध्ये यापूर्वी निर्माण झालेला वाद मिटला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल झाली होती. परंतु, भावाच्या मनात राग खदखदत होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले.