‘पुण्य भूषण’ पुरस्काराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचावा

0

– उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

पुणे : एन पी न्यूज 24 – भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वतर्मानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पाहोचविण्याची गरज असून भारताला समृध्द करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे अवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

 

येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात ‘पुण्य भूषण फाऊंडेशन’आणि पुणेकरांच्यावतीने दिला जाणारा ‘पुण्य भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ एस. बी. मुजुमदार, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, डॉ के. एच. संचेती उपस्थित होते.

 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी आहे. पुणे हे देशातील सर्वात सुंदर शहर आहे. शैक्षणिक केंद्र असणाऱ्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले दाम्पत्य, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यांच्यासह थोर समाजसुधारकांचा वारसा आहे. या शहरातील पुण्यभूषण पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल.

या वर्षीचा पुरस्कार पुरातत्वज्ज्ञ डॉ. देगलूरकर यांना दिल्याने या निमित्ताने पुरातत्व शास्त्राचा गौरव झाला आहे. पुरातत्व शास्त्र हे खरा इतिहास समोर आणण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपला सांस्कृतिक इतिहास उजेडात आणण्याचे काम करते. देशातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मृतीस्थळे आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे हा समृध्द वारसा जपण्याचे काम सर्व देशवासीयांनी एकत्रितपणे करण्याची आवश्यकता आहे. आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी त्यांना देशाच्या सांस्कृतीची ओळख करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक स्थळांना भेटींचे आयोजन शैक्षणिक संस्थांनी करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Posts