प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी

प्लॅस्टिक

 

पुणे : एन पी न्यूज 24 – प्लॅस्टिकच्या फुलांची आयात पूर्णपणे बंद करावी आणि प्लॅस्टिकच्या नकली फुलांवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी राज्यातील फूल उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने राईज एन शाईन बायोटेकच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन केली.
देशातील उच्चशिक्षित शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून हायटेक पॉलिहाऊस व शेडनेट पद्धतीने फुलशेती व्यवसाय निवडला आहे. परंतु प्लॅस्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुलांची विक्री अत्यंत कमी झाली आहेत. त्यामुळे फुलशेती उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालावी असे निवेदनात म्हटले आहे.
देशातील ७२५ जिल्ह्यांमध्ये सरासरी ३०० नर्सरी आहेत, म्हणजेच दोन लाख १७५०० इतकी नर्सरींची संख्या आहे. प्रत्येक युनिटमध्ये किमान १५ कुशल कामगार आहेत. फुलशेतीचा व्यवसाय धोक्यात आल्यास सुमारे ३५ लाख कर्मचार्‍यांवर बेकारीची वेळ येऊ शकते. तसेच फुल उत्पादनावर अवलंबून असणारे पूरक व्यवसायही धोक्यात येऊ शकतात.
प्लॅस्टिक फुलांमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे तसचे त्यातील रसायनामुळे त्वचेचे आणि श्‍वसनाचे विकार पसरतात. या फुलांचे विघटन होत नाही. प्लॅस्टिक फुलांच्या सेवनामुळे त्यातील रासायनिक रंगांमुळे जनावरांच्या विशेषतः गायींच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. याफुलांमुळे मातीची सुपीकता व वातावरणाचा समतोल बिघडतो. शासनाने प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली आहे. आता प्लॅस्टिक फुलांवर संपूर्ण बंदी घालावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.