विरोधकांनी मेगागळतीची चिंता करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : एन पी न्यूज २४ – आमच्या मेगाभरतीची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या मेगागळतीची चिंता करावी. थोडं आत्मचिंतन करावं, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.  राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी काल नवी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. यावर विरोधकांनी भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे अशी खिल्ली उडवणे सुरु केले आहे. विरोधकांच्या या विधानावर  टीका  करताना फडणवीस म्हणाले की , ‘काहींना आमच्याकडे सुरू असलेल्या मेगाभरतीची चिंता लागली आहे. मात्र त्यांनी त्याची चिंता करू नये. त्यांच्याकडे मेगागळती का सुरू झालीय, याचं थोडं आत्मचिंतन करावं.’

सत्तेची  मुजोरी दाखवणार नाही –

जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही सत्तेत आलो आहेत. आम्ही उतणार नाही. मातणार नाही. सत्तेची माजोरी आणि मुजोरीही दाखवणार नाही,  आम्ही यापुढेही विकासाची कामं करतच राहणार. अशी हमी देतानाच पुन्हा सत्तेत आल्यावर एकही राज्य महाराष्ट्राच्या स्पर्धेत राहणार नाही, असा महाराष्ट्राचा विकास करू, असं आश्वासनही फडणवीस यांनी  यावेळी दिलं.

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. त्याचसोबत नवी मुंबईतले राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवकही भाजपात आले आहेत.

गणेश नाईक हे विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरुच होती. काल त्यांनी  भाजपात प्रवेश केला. गणेश नाईक हे नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जात होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.