विधानसभा 2019 : युतीमध्ये जागांची अदलाबदली ! सिल्‍लोड शिवसेनेला तर वडाळ्याची जागा भाजपाकडे

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली जागावाटपाची चर्चा सुरु केल्यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपने देखील जागावाटपाची अंतिम चर्चा सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत निम्म्या- निम्म्या जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुन्हा भाजप शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या प्रयत्नांत आहे.

या विधानसभा निवडणुकीत भाजप 154 ते 159 जागा लढविणार तर शिवसेना 120 जागा लढविणार असल्ल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा देणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेना हा फॉर्म्युला स्वीकारणार कि नाही हे पाहणे फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर या जागावाटपात अनेक जागांची अदलाबदली देखील केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या मतदारसंघाची अदलाबदली होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 20 ते 25 जागांची अदलाबदली केली जाणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे जागाबदली अपरिहार्य आहे. यामध्ये वडाळा, सिल्लोड यांसारख्या जागांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भाजपने दिलेल्या या फॉर्म्युल्यावर शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर जागावाटपात कोण माघार घेतो त्यावर देखील युतीची समीकरणे अवलंबून असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.