कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी SIT कडून आणखी 3 संशयितांना अटक

कोल्हापूर : एन पी न्यूज 24 – ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खुन खटल्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना आज कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सचिन अंदुरे याला यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी सीबीआयने अटक केली होती. नालासोपारा येथून दहशतवाद विरोधी पथकाने मोठा शस्त्रसाठा पकडला होता. त्याच्या चौकशीत सचिन अंदुरे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे उघड झाले होते. या तिघांना सीबीआयने अटक केली होती. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एसआयटीने यापूर्वी शरद कळसकर याला अटक केली आहे.
Maharashtra: Special Investigation Team (SIT) investigating Govind Pansare murder case has taken the three accused in custody. They will be produced in Kolhapur court today.
— ANI (@ANI) September 6, 2019
सचिन अंदुरे याला पुण्यातील येरवडा कारागृहातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन यांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून आज पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १२ झाली आहे. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याचा नेमका काय संबंध आहे हे अद्याप समोर आले नाही. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्याबाबत नेमकी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.