काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटलांचा गणेश विसर्जनानंतर भाजपमध्ये प्रवेश ?
इंदापूर :एन पी न्यूज 24 – (सुधाकर बोराटे) – बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजीच्या इंदापूर विधानसभा संकल्प मेळाव्यात हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये राहणार की भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेणार याबाबतची उत्सुकता उपस्थित सर्वांनाच लागली होती. मिनिटा-मिनिटाला सभेतील कार्यकर्त्यांकडुन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. अनेकवेळा सर्व कार्यकर्त्यांकडुन एक आवाजात हात वर उंच करून भाऊ भाजपात प्रवेश करा अशा घोषणा दिल्या जात होत्या. बर्याच वेळा कार्यकर्त्यांमधुन भाजप प्रवेशाबाबत गोंधळही घातला गेला. त्यामुळे सर्वांच्याच नजरा हर्षवर्धन पाटील हे कोणता निर्णय घेणार याकडे लागले होते. परंतु तुम्हाला जो निर्णय हवा आहे त्याच्याशी मी ही सहमत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले व येत्या ११ तारखेपर्यंत योग्य असाच निर्णय घेऊ असे सांगितल्याने उपस्थित सर्वांचाच भ्रमनिराश झाला आणि हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यातच राहीला.
आम्ही कुणाच्या विरोधात बोलत नाही म्हणून आम्ही कमजोर आहे असे कोणी समजायचे कारण नाही. आम्ही विरोध केला नाही म्हणून आम्ही बोलायला घाबरतोय अस कोणी समजायचं कारण नाही. आमच्या प्रामाणिकपणा व सभ्यपणाचा राष्ट्रवादीने आजवर गैर फायदा घेतला. बारामतीच्या विश्वासघातकी राजकारणाला इंदापूर तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. आजपर्यंत बारामतीकरांनी आमचा चांगुलपणा बघितला, परंतु इथुन पुढे आमचा आक्रमकपणा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचे मत राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघ २०१९ च्या भव्य जनसंकल्प मेळाव्यात इंदापूर येथील मार्केट कमेटी मैदानावर बोलत होते. ते पुढे म्हणाले की कै. शंकरराव भाऊ व कै. घोलप साहेबांनी शिकविलेला स्वाभिमान आमच्या रक्तात आहे. आम्ही कै. भाऊंचा विचार पाळला म्हणून एकदा नाही, दोनदा नाही तर सलग पाचवेळा लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केले आहे. परंतु आम्हाला पदरी काय मिळाले ? निराशाच. २०१९ च्या लोकसभेला देखील आम्ही कार्यकर्त्यांचा विरोध डावलुन सुप्रिया सुळेंच काम केलं आणि इंदापूर तालुक्यातुन ७१ हजाराचे लीड देवुन सुप्रिया सुळे यांना निवडून येण्यास प्रामाणिकपणे मदत केली. जर आम्ही मदत केली नसती तर बारामती लोकसभेचं चित्र वेगळं दिसलं असतं असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
इंदापूर तालुका एक कुटुंब आहे. या सगळ्या कुटुंबाला एकत्र घेवुन जाण्याचं काम आम्ही केलं. या तालुक्यातील सर्व जाती धर्माला एकत्र घेवुन जाण्याच काम आम्ही केलं, ना जात बघीतली, ना पात बघीतली, ना गट बघीतला, ना विरोधक बघितला. आलेल्या प्रत्येक माणसाला एकत्र घेवुन जाण्याचा प्रयत्न आम्ही केला, परंतु घडले मात्र वेगळेच. १९९१-९२ मध्ये काँग्रेसचे ४२ खासदार निवडून आले होते. त्यावेळी फेर निवडणुकीत ४० खासदारांना तीकीट दिले आणि दोन खासदारांना तीकीट नाकारले त्यामध्ये कै. शंकरराऊ भाऊंचा समावेश होता. त्यावेळी भाऊंचे तिकीट कापून ते तिकीट बारामतीच्या अजित पवारांना दीलं. तरीही नाराज न होता भाऊंच्या आदेशाच आम्ही पालन केलं. त्यानंतर २००९ च्या विधानसभेला सध्याच्या विद्यमान आमदाराला राष्ट्रवादीशी बंडखोरी करून निवडणूकीत उतरविले. पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी पक्षातुन निलंबीतही केले व लगेच सहा महिन्यांनी त्यांना जि. प. निवडणूकीचे तिकीट दीले. नंतर जिल्हापरिषद अध्यक्षपदही दीले. असली राष्ट्रवादीची कुट निती असताना देखील २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सर्व कार्यकर्त्यांचा विरोध असताना देखील सुप्रिया सुळेंच काम आम्ही प्रामाणीकपणे केलं. तरीही राष्ट्रवादीकडून आम्हाला दगाबाजी, अपमान, अन्याय सहन करावा लागला. परंतु इथुन पुढे असा अन्याय सहन केला जाणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बाळासाहेब डोंबाळे म्हणाले की, लोकप्रतिनिधीमुळे तालुक्याचं पाच वर्षात मोठं नुकसान झालेलं आहे. इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकाळात तीस ते पस्तीस लाख मे. टन ऊस उत्पादन होत होते ते गेल्या पाच वर्षात वीस लाख मे. टनाने उस उत्पादन घटले. उजनीच्या पाण्यावर शेजारच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपापले तालुके सुजलाम सुफलाम केले परंतु इंदापूर तालुक्यातील निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्याचा विकास खुंटल्याचे मत बाळासाहेब डोंबाळे यांनी व्यक्त केले.
पदमाताई भोसले, लालासाहेब पवार, कु. अंकिता पाटील, कृृृृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, मंगेश पाटील, मयुरसिंह पाटील, वसंत मोहळकर, अतुल व्यवहारे, सोनवणे, देवराज जाधव, अंकिता शहा, भरत शहा, दिपक जाधव, नंकुमार सोनवणे, कैलास कदम, रमेश जाधव, निवृृत्ती गायकवाड इत्यादी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृृष्णाजी यादव यांनी केले तर प्रास्ताविक रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.