कोयना धरणाजवळ नवजा येथे अतिवृष्टी, तब्बल 316 मिमी पाऊस

0

पुणे : एन पी न्यूज 24 –  कोकणाबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून कोयना धरणाजवळील नवजा येथे गेल्या २४ तासात तब्बल ३१६ मिमी पावसाची नोंद झाली तर कोयना येथे १५६ मिमी पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्याने पुन्हा एकदा पूराचा धोका समोर आला आहे.

हवामान विभागाने मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोयना येथे १४५ मिमी पाऊस झाला असून धरण जवळपास १०० टक्के भरले आहे. महाबळेश्वर, नवजा परिसरात पडलेल्या पावसाचे सर्व पाणी कोयना धरणात येत असल्याने सध्या धरणातून ८५ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. वारणावती येथे ५३ मिमी पाऊस झाला असून धरणातून १५ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. राधानगरी येथे १२८ मिमी पाऊस झाला असून धरणातून सध्या ७ हजार क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. कासारी धरणावर १६६ मिमी पाऊस झाला असून धरणातून सध्या ५ हजार ८२२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाटगाव धरणावरही १४० मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातून ६ हजार १८८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा –

राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले असून आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या सर्व धरणे पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले तर धरणात येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचगंगेसह इतर सर्व नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

या सर्व नद्यांचे पाणी शेवटी कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे कृष्णा नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. सध्या तरी कोयना, कृष्णा या धोक्याच्या पातळीपासून खाली वाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.