5 लाख रूपयाची लाच घेताना जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

0

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अटक केलेल्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे (रा.वसंत विहार, फ्लॅट नं.१३, पाचवा मजला, बडदेनगर, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), खाजगी इसम सचिन उत्तमराव महाजन (वय ३३ वर्ष, धंदा खाजगी वालक, रा.वसंत विहार, फ्लॅट नं. ११, चौथा मजला, बडदेनगर, शिवाजी चौक, सिडको, नाशिक), मच्छिंद्र मारुती गायकवाड (वय ४८ वर्ष, धंदा. नोकरी, लॅब बॉय, वर्ग ४, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, एम.आय.डी.सी.) यांचा समावेश आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांना प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे अनुसचित जमाती प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी म्हणून शिर्डी येथे लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान उपसंचालक रामचंद्र सोनकवडे यांचे उपस्थितीत विधी अधिकारी शिवप्रसाद काकडे, विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. ती लाचेची रक्कम उपसंचालक व विधी अधिकारी यांच्यावतीने विनायक महाजन व मच्छिंद्र गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष मध्यरात्री एक वाजता शिर्डी येथील हॉटेल साई आसरा समोर स्वीकारली. त्यावेळी चौघांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोहेकॉ. तन्वीर शेख, पोना. प्रशांत जाधव, पोना.रमेश चौधरी, पोहेकॉ. सतीष जोशी, चालक पोहेकॉ.अशोक रक्ताटे, पोना.विजय गंगुल, मपोकॉ.राधा खेमनर, पोकॉ रविंद्र निमसे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.