…तर लोकांना गोळ्या घालणार का ? शिवसेनेच्या निशाण्यावर पुन्हा मोदी सरकार

मुंबई : एन पी न्यूज 24 – काश्मीरमधील कलम ३७० हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र काश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. काश्मीरात विद्रोही रस्त्यांवर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर मागे रेटता येईल. पण आर्थिक मंदीवर बंदुका कशा रोखणार मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक भूक भूक करीत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार काय? आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलट सुलट सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा मनमोहन यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे, अशा शब्दात सामना मधून उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीबाबतच्या चर्चा सुरु असतानाच सामनातून केंद्र सरकारवर केलेल्या टिकेमुळे राजकीय क्षेत्रात एकच चर्चा सुरु झाली आहे. भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून ही खेळी खेळली जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
सामन्याच्या अग्रलेखात मनमोहन सिंग यांच्या पाठोपाठ नितीन गडकरी यांचे तितकेच टोकदार वक्तव्य आले आहे. सरकार जेथे जेथे हात लावते तेथे तेथे सत्यानाश होत असल्याचा भाला गडकरी यांनी खुपसला आहे. नोटाबंदी व जीएसटी ही या सत्यानाशाची उदाहरणे आहेत. उद्योग, व्यापार करणाऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल. पण देश मात्र कोसळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे.
आर्थिक मंदीचे राजकारण करु नये व तज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे, त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे. अशा शब्दात शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे.