राज्यात आगामी 2 दिवस मुसळधार पाऊस : हवामान विभाग

मुंबई : एन पी न्यूज 24 – मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने असाच पाऊस सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. कोकणसह मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचप्रमाणे अरबी समुद्रात समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश ते मध्य महाराष्ट्रादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच पुणे जिल्ह्यतील घाट माथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहेत. कोकण किनारपट्टीमध्ये विशेषतः रायगड, सिंधूदुर्ग, मुंबई आज आणि उद्या पाऊस सातत्याने राहील. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.