‘या’ 5 कारणांसाठी भारत आणि इस्रोसाठी ‘चांद्रयान -2’ मोहीम खुप ‘खास’, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –  इस्रोच्या वैज्ञानिकांनी 45 दिवसांपूर्वी चंद्रयान -2 लाँच केले. तीन दिवसानंतर विक्रम लाँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या अभियानासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जवळजवळ एक दशक मेहनत घेतली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लँडर आणि रोव्हर स्वतः तयार केले. आता हे अभियान पूर्ण होण्यासाठी फक्त 45 तास शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षात इस्रोने यशाचे अनेक टप्पे पार पाडले. अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करत आपल्या शास्त्रज्ञांनी अवकाशाला गवसणी घातली. इस्रोसाठी आणि भारतासाठी चांद्रयान -2 मोहीम विशेष आहे. जाणून घ्या कारणे –

1. वैज्ञानिक क्षमता दाखवून दिली – जेव्हा रशियाने नकार दिला, तेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी स्वत: लँडर-रोव्हर बनविले –

नोव्हेंबर 2007 मध्ये रशियन अंतराळ संस्था रॉस्कोस्मोसने सांगितले की, ती चांद्रयान प्रकल्पाला मदत करेल. त्यासाठी इस्रोला लँडर देईल. 2008 मध्ये या अभियानास शासनाची परवानगी मिळाली. चंद्रयान -2 ची डिझाईन 2009 मध्ये पूर्ण झाली. जानेवारी 2013 मध्ये लाँच करण्याचे वेळापत्रक होते, परंतु रशियन अवकाश संस्था लँडर देऊ शकली नाही. त्यामुळे भारताने स्वतःचे लँडर बनवायचा निर्णय घेतला. काही कारणास्तव चंद्रयान -2 ची मोहीम पुढे ढकलण्यात आली. जुलै 2019 मध्ये चंद्रयान लाँच करण्यात आले. या अभियानाच्या यशावरून हे स्पष्ट होते की भारतीय वैज्ञानिकांना इतर देशाच्या मदतीची गरज नाही. ते कोणतेही मिशन पूर्ण करू शकतात.

2. अंतराळ विज्ञानाच्या जगात भारताची प्रतिमा उंचावण्यात इस्रो यशस्वी –

चंद्रयान -2 या मोहिमेमुळे अंतराळ विज्ञानाच्या जगात भारतीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी इस्रो यशस्वी ठरली आहे. आतापर्यंत जगातील फक्त पाच देशांनी चंद्रावर लँडिंग केले आहे. अमेरिका, रशिया, युरोप, चीन आणि जपान यानंतर चंद्रावर लँडिंग करणारा भारत सहावा देश असेल. रोव्हर उतरविण्याच्या बाबतीत चौथा देश आहे. जर हे मिशन यशस्वी झाले तर चंद्रावर स्वदेशी लँडर उतरवणारा भारत पहिला देश असेल.

3. चंद्रावरील अशी जागा निवडली जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचला नाही –

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणताही देश चंद्राच्या ज्या भागावर पोचला नाही त्या भागावर चंद्रयान 2 उतरेल व संशोधन करेल. चंद्राबद्दल माहिती गोळा करण्यासाठी चंद्राचा दक्षिण ध्रुवीय प्रदेश निवडला आहे.

4. चंद्रयान -2 मिशनमध्ये वापरलेला सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV Mk-III –

GSLV Mk-III हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली लाँचर आहे. हे संपूर्णपणे देशात बनवले गेले आहे. या रॉकेटच्या माध्यमातून 5 जून 2017 रोजी जीसॅट -19 यशस्वीरित्या आणि 14 नोव्हेंबर 2018 रोजी जीसॅट -29 लाँच करण्यात आले आहे. या रॉकेटच्या अत्याधुनिक अवतारातून इस्रोचे मानवनिर्मित गगनयान पाठवले जाईल अशीही अपेक्षा आहे.

5. चंद्रयान -2 जगाला चकित करणारे शोध लावणार –

चंद्रयान -2 लँडर विक्रम ज्या ठिकाणी चंद्रावर भूकंपप्रवण क्षेत्र आहे त्याच ठिकाणी तपासणी करेल. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर रासायनिक परीक्षण करेल. तापमान आणि वातावरणात आर्द्रता आहे की नाही यावरही संशोधन करण्यात येईल. चंद्रच्या पृष्ठभागावरील पाण्याचे पुरावे चंद्रयान-1 ने शोधून काढले होते आता चंद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर आणि भूगर्भाच्या आत किती प्रमाणात पाणी आहे याविषयी संशोधन करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.